शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

म्याड फॉर इच आदर

 म्याड फॉर इच आदर


सिनेमा म्हटलं की सगळं कसं वेगळ्याच दुनियेतलं दिसू लागतं आणि आपण त्यात रमून जातो.

काही निखळ मनोरंजन म्हणून तर काहीजण स्वतःला रिलेट करता आलं त्यातून म्हणून तर काहीजण सोशल रिऍकशन म्हणून या माध्यमाकडे आकर्षित होत असतात. पण मेड फॉर इच आदर, पराकोटीचा संघर्ष , कुणीतरी शोधलेली वेगळी वाट,शॉकिंग/ सुखासीन/दुःखदायक द एन्ड च्या संकल्पना या खरंतर फक्त सिनेमा साठीच योग्य आहेत अशी माझी ठाम समजूत होऊ लागली आहे.

दोन तासात ज्या गोष्टीचा उरक उरकायचा आहे त्यातल्या घटना कशा धारदार टोकदार आणि वेगवान असतात. प्रेमी जीवाचं दिसणं वागणं बोलणं राहणं सुद्धा असंच मॅच असलं की ते पाहणं सुद्धा 'के दिल अभी भरा नहीं' अशा अवस्थेत घेऊन जातं!


खऱ्या माणसाचा सिनेमा हा काही हिरोगिरी गाजवण्यासाठी नसतो. तिथली माणसं सामान्य शक्ती असलेले कधीही भांगपट्टी न करणारे अगदीच बिन इस्त्रीची कपडे घालणारे आणि खुरटलेली दाढी वाढवून घरादाराची काळजी करत फिरणारे असतात. त्यांना हिरोईन वर प्रेम करावं अशा प्रेरणा हिरोईन म्हणवणारी बायको कितीही सुंदर असली तरी मिळणं फार अवघडच असतं! त्यांचा रोमान्स हा फक्त बेडवर बायकोला कधी वेळ मिळालाच तर कुशीत घेणे किंवा महिन्याकाठी पोराबाळांसकट फिरायला गेल्यावर पाणीपुरी खाऊ घालणे,आईसक्रीम खाऊ घालणे असा लिमिटेड असतो.

महिनाकाठीचे 'इ एम आय' चे आकडे आणि किरणामालाची यादी यातच तो दमून अगदीच शेजारी झोपलेल्या घामेजलेल्या बायकोला आणि निष्पाप मुलांना वाढताना पाहून तृप्त होत असतो.त्यांच्या विवंचना भले छोट्या असतील पण त्या व्हिलन म्हणाव्यात इतक्याही जीवघेण्या वाईट नसतात.

त्यांच्या स्वप्नांची बजेट्स सुद्धा मर्यादित असली तरी ते त्यात खुष असतात.त्यांना फाईट करायची असते ती पोट भरण्यासाठी आणि त्यासाठी त्यांनी अगदी मोहल्लेके दादा ला मारावं इतकं काही गल्लीत कुणी त्यांच्याशी वाकडं वागत नाही.

हिरो सारखी जिम करावी म्हटलं तरी त्यासाठी द्यावा लागणारा वेळ आणि पोषक असा आहार ते पोराबाळांना देऊन मोकळे झालेले असतात.चार विरंगुळ्याचे क्षण साजरे करण्यासाठी गाणी हवीतच आजूबाजूला! आणि त्यासाठी चार भिंतींच्या आतच कुकर शिट्टी मारतो,वॉशिंग मशीन कपडे डूगडुग करत तबला वाजवते आणि टीव्ही वरच्या मालिका , गल्लीतली वाहने बॅकग्राऊंड म्युझिक वाजवतात आणि लिरिक्स म्हणजे पोराबाळांचे केकाटणारे बिनार्थी संवाद !

प्रेम असतंच पण व्यक्त करायचं कसं ? हलके चुकून आणि ओझरते झालेले स्पर्श हे सासूबाई बघतील किंवा मुलं मोठी होत आहेत बास करा आचरटपणा अशा शेलक्या शब्दात व्यक्त होत राहतात.

आयुष्यात एकदम जादू वाटाव्यात अशा लोकांची/ वस्तूची एन्ट्री होते आणि आयुष्य बदलूनही जातं खरं पण ती सगळीच लोकं आणि वस्तू आनंद देतीलच असं नाही! काही  लोकं (नातेवाईक) नको असताना टपकतात तर काही हवीहवीशी या दुनियेतूनच गळतात.काही वस्तू खूप घासाघीस करून घरात प्रवेश करतात आणि त्या हव्या तशा वापरताच येत नाहीत. त्याने हिरो कातावून गेलेला असतो.

हिरो - हिरोईन प्रमाणे विरह तर कायम ठरलेला असतो.सकाळी तास दोन तास आणि रात्री तास दोन तास वाट्याला येतात मग त्यातही दिवसभराची उजळणी करण्यापेक्षा उद्या काय काय वाढून ठेवलंय ते बोलण्यात जातो आणि कुचंबलेल्या मनाने नवरा बायको इच्छा नसतानाही पाठीला पाठ लावून कधीतरी झोपून गेलेले असतात.

एकमेकांसाठी इतक्या कसोट्याचं आणि विनाअपेक्षांचं आणि फक्त पुढच्या पिढीसाठी म्हणून स्वतःला झिजवून घेणं हेच खरं आयुष्य आहे आपलं आणि ते एकमेकांनी एकमेकांना न सांगता एकमेकांसाठी स्वीकारलं आहे ! यापेक्षा सुखासीन द एन्ड काय असू शकतो या सिनेमाचा?

हे सगळं मेड फॉर इच आदर म्हणण्यापेक्षा 'म्याड फॉर इच आदर' असेल तरच जमू शकतं . नाही का ?



© मकरंद घोडके

९५२७३०९१९७


सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

विमलवाली मुलगी

विमलवाली मुलगी


रस्ता तसा नेहमीचा रहदारीचा. दुतर्फा गर्दीचे लोंढे आणि कुणीच कुणाचं ऐकणार नाही पाहणार नाही अशा अवस्थेत वाहणारा रस्ता!
अचानक एक मुलगी रस्त्याच्या मधोमध कुठून तरी दिसू लागते तिच्याकडे आवर्जून पहावं म्हणून कोणीही विशेष पाहत नाही. परंतु पर्याय नाही आणि थांबावच लागेल म्हणून सिग्नल लाल होतो.
मग अश्लील रसिकतेने बऱ्याच नजरा त्या मुलीकडे..
एकंदरीत पेहरावावरून लक्षात आलं कि हि मुलगी तुमच्या आमच्यासारखी जरी असली तरी भीक मागणाऱ्यापैकी एक आहे. प्रत्येक माणसाला फक्त अवयव तुमच्या आमच्यासारखे जरी असले तरी पेहरावावरून ओळखण्याची आपली एक वेगळी सामाजिक मानसिकता आहे. काहींनी घाणेरड्या नजरेने काहींनी तुच्छतेने काहींनी कनवाळू पणे तिला पाहून उसासे सोडले. काहींनी सिग्नल साठी सुद्धा पुढच्या कामात येणाऱ्या खोळंब्या साठी म्हणूनही शिव्यांची एक लाखोली वाहिली.
तिचे डोळे थोडेसे धुंदावलेले. बहुतेक डोळ्यावर खूप झोप आल्यामुळे असेल. 
सिग्नल थोडा मोठा असल्यामुळे तिच्या प्रत्येक अवयवाकडे आता प्रत्येकाचं लक्ष जाऊ लागलं आणि एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तिचं पोट पुढे आलेलं आहे. अर्थात ती गरोदर आहे हे निश्चित होतं. त्यात पुन्हा मग ती भिकारी!
भिकारी आणि त्यांचं जीवन! त्यांचं रोजचं दिनमान कशाप्रकारे असेल. दिवसभरात ते पैसा कसा गोळा करत असतील? त्यांना संध्याकाळी पोट भरेल एवढं अन्न खायला मिळत असेल का ?याचा विचार करत सिग्नलवरच्या गाड्या मुठी आवळू लागल्या.
तिचं कुणाकडेच लक्ष नव्हतं खूप सारे आवाज ज्यात वेगवेगळ्या गाड्यांच्या फायरिंग ॲम्बुलन्स हॉर्न असं साग्र संगीत वाजत होतं.
आणि काही कळायच्या आतच तिने ब्लाउज मध्ये हात घातला आणि एक विमल ची पुडी बाहेर काढली.
जेव्हा तिने ब्लाऊज मध्ये हात घातला तेव्हा बरेचसे डोळे विस्फारले गेले होते आणि जेव्हा तिच्या हातामध्ये ती पुडी आली तेव्हा सर्वांनी चुकचुकल्या नजरेने नाराजी दर्शवली.
आता ती गरोदर आहे तिला चांगल्या पौष्टिक आहाराची गरज आहे तिने भीक मागण्यापेक्षा बैठी काहीतरी चांगली कामे करावीत हे असं रस्त्यावर फिरू नये असं खूप सारं वाटून गेलं.
पण मुठी शिवशिवण्या पलिकडे घडण्यासारख काहीच नव्हतं!
आणि असंही ती आपली कोण लागते किंवा तिचा आणि आपला फक्त या सिग्नल पुरता तोही नजरेने आलेला संबंध !
आपण आपल्या संबंधित लोकांसाठी तरी असं आवर्जून म्हणून तरी कुठे काय करत असतो? चार सल्ले देणे आणि घेणे याच्यापलीकडे कोणीही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जाऊन डोकावू शकत नाही किंवा मदत करू शकत नाही ही वस्तुस्थिती आता मान्य केलीच पाहिजे. असा विचार डोक्यात आला आणि पांढरपेशा ढिम्मपणा जागा झाला. मग सरकार एनजीओ आणि इतर सामाजिक संस्था यांनी कसं पुढे येऊन या लोकांना मदत केली पाहिजे असे अनाहूत सल्ले स्वतः स्वतःच्या मनात तिच्यासाठी म्हणून देऊन टाकले. 
आता तिने ती पुडी उघडली त्याच्यामध्ये जो काही माल होता तो घशामध्ये उपडा केला आणि ती पुढे पुन्हा व्यवस्थित घडी घालून ब्लाउज मध्ये सरकवली .सिग्नल सुटला ती एका बाजूला पुढे सटकली आणि एक सणसणीत नक्षीदार आणि पाणीदार हाफकऱ्याचा आवाज येईल अशी पिचकारी डांबर रंगावर हाणली जणू काय ती सिग्नलवरच्या प्रत्येक नजरेवर, सरकारी अनास्थेवर बोलणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडावर आणि समाजाचा कळवळा असणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर तिने मारली. 
सिग्नल सुटला तशी विमल ची पुडी तिने हवेत उडवली आणि पुढे आलेलं पोट सावरत कुठेतरी निघून गेली.



© मकरंद घोडके ९५२७३०९१९७

लॉग आऊट

काही जुन्या डायऱ्या आणि मी असे अडगळीत कधीतरी गप्पा मारत असतो ! सांगत असतो एकमेकांना असंच काहीबाही वगैरे वगैरे ... काही तपशील असे लिहून हाता...