काही जुन्या डायऱ्या आणि मी असे अडगळीत कधीतरी गप्पा मारत असतो! सांगत असतो एकमेकांना असंच काहीबाही वगैरे वगैरे...काही तपशील असे लिहून हातावेगळे झाले तरी ते चिकट आणि चिवटपणे साठत राहतात तिथे आणि खूप वेळा तिथे रेंगाळणाऱ्या आठवणी होऊन जातात विनापाश! त्याच्यावर आपला छाप असतो खरा, पण त्या तितक्याच आपल्या नसतात हेही खरं आहे!
चार्वी माझी मैत्रीण नाही की ओळखीची सुद्धा नाही! एका ब्लड बँकेत भेट झाली रिसेप्शन काउंटर ला!
कुणास ठाऊक कधीतरी या डायरीत जाऊन बसली आणि परवा अचानक तिचा फेसबुक फ्रेंड request चा बॉम्ब आदळला.मग ती accept करण्याआधी तिची डायरीमधली काही पेजेस वाचली..
असं म्हणतात जी माणसे खास असतात तीच तुमच्या
वैयत्तिक डायरीचा एक कोपरा होऊन बसतात.
त्यातलीच ही दोन पाने..
चार्वी. ही ब्लड डोनेशन व्हावं म्हणून काम करणारी पोरगी
सोशल वर्क मध्ये आली खरी पण तिला स्वतःलाही ठाऊक नाही की तिच्यात जे रक्त आहे ते कुणाचं आहे?
तिची आई वेश्या आहे-किंवा होती म्हणूयात! सगळ्या बायका तशा सारख्याच पण ज्यांच्या शरीर जखमा कुणीही
ओरबाडू शकतो तशा त्या वेश्याच!
चार्वीला तशी काही खंत नाही म्हणा,कारण त्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा तिने जो मार्ग स्वीकारला आहे तो क्वचितच कोणी
स्वीकारला असता!
''वेश्या पुन्हा पुन्हा जन्मते म्हणून जितका पुरुष
जवाबदार आहे तितकंच स्त्रीचं शरीरही
जवाबदार आहे!'' असं ती म्हणते जे मला पटत नाही पण उगाच वाद नको म्हणून आपलं मी ‘हो’ला‘हो’ म्हणतो आणि ती तिचं म्हणणं ठासून मांडते-
बलात्कार शोषण हे हल्लीचे ट्रेंडिंग शब्द आहेत.
ते येण्यापूर्वी सुद्धा ते होतच होतं पण ते त्या छोट्या म्हणीत अडकून बसलं होतं-पावसाने झोडपलं आणि नवऱ्याने मारलं तर दाद कुणाकडे मागायची? - म्हणजे तो पुरुषांचा हक्कच
होता! मग स्त्रिया शिकल्या त्यांना कळलं की आपल्याला सुद्धा ‘स्व’ आहे आणि तो व्यक्त केला पाहिजे. तसं या पिढीतल्या आजूबाजूच्या स्त्रिया मोठ्या ‘स्व’ घेऊन मिरवत असतील कदाचित! पण त्याचं काय कौतुक नाही पुरुषाला! तसं ते कुठल्याच काळात पुरुषाने मान्य केलेलं नाही, पण आता फरक इतकाच की ती कमावती आहे त्यामुळे हवं तेव्हा ती पुरुषाला झुगारून देऊ शकते. आता पुरुषाच्या म्हणण्याला ती फार महत्व देत नाही.
तीही कधीतरी शरीरधर्माने
भटकत असते.पुरुषाचा बाहेरख्यालीपणा व्यसनीपणा तसा समाजमान्य असतो तसं तेच स्त्रीने केलं तर हाहाकार माजतो इतकी पावित्र्य जपण्याची मोठी जवाबदारी तिच्यावर इतर कामांच्या बरोबरीने आहे.
मी लहान होते तेव्हा कळायचं
नाही की रोज बिना ओळखीचे कोण पुरुष इथे आपल्या खोलीत येतात आणि ओळख व्हायच्या पटायच्या आत पसारही होतात! का बरे येत असतील ते? मग दहा रुपयांची नोट हातात पडायची आणि सगळं विसरायला
व्हायचं.. खायला मिळायचं, बागेत जायला,फिरायला मिळायचं.
पण शाळा?? ती अशीच दुनियदारीची शिकावी लागली.
जेव्हा मला पहिली पाळी आली तेव्हा सगळ्या
मावश्या खुष होत्या.आई खुश होती का? ते मला कधीच कळलं नाही.पण मी तिथून बाहेर पडले आणि काम शोधून स्वतःच स्वतःचं कमवून राहू लागले. आणि हळूहळू कोणत्या भूतकाळातून आपण आलोय ते समजू लागलं.मग पेपर मध्ये चर्चा म्हणून होणारे बलात्कार त्याची कारणे
आणि आपण त्याचा भाग कसा आहोत ते कळू लागले.
मग पुन्हा याच वस्ती-वाड्यांमध्ये आले समाजशिक्षणाचं पुस्तक घेऊन तेही कुठला अभ्यास न करता! कारण तो रक्तातच होता.
बापही माझा असाच कुणीतरी मजूर असेल..भटकत इथे या वाड्यांमध्ये आईला भेटला असेल आणि कार्यभाग
उरकून गेलाही असेल.
बरेच बलात्कार या वस्त्यांमध्ये विरून गेलेत
ज्याची सरकार दफ्तरी काहीही नोंद नाही आणि त्याविरोधात हाताच्या बोटांवर मोजावे इतके पडसाद इथल्या पेपरांमध्ये उमटले असतील.
आणि ही बायांच्या शरीराची ठेवणच अशी आहे की
त्याला पुरुषासाठी म्हणून साजशृंगार करण्यात आनंद वाटतो त्यांच्या प्रेमवर्षावाने खुश होण्यात त्यांच्या आनंदात न्हाऊन जाण्यात आनंद वाटतो.
फरक इतकाच की शरीर सुद्धा मनाने हव्या त्या पुरुषाकडून ते
सगळं मिळवून घेऊ लागलं की त्याला प्रेम आणि नको असलेल्या पुरुषाकडून आलं की त्याला
बलात्कार म्हणू लागतं!
चार्वीची विचारांची रोखठोक असणारी बैठक बऱ्याचदा
मला अंतर्मुख करते आणि सांगत राहते अजूनही आपण फक्त समजून घेत आलोय हे सगळं..पण जगू शकलो असतो का हे सगळं असं??
डायरी मिटून ठेवली आणि
फ्रेंड request accept केली चार्वीची !तिला कनेक्ट झालो मी!पण खरंच कनेक्ट झालो का तिच्याशी??
चार्वीचा मेसेंजर वर hi आला!
मी- hi
चार्वी- आहेस कुठे
मी- इथेच.तू?
चार्वी- मी पण इथेच.
मी- fb ला कशी ?
चार्वी- माणसे हल्ली इथेच भेटतात.
मी- हं पण याचा पण कंटाळा येतो.
चार्वी- हो ना.
मी- मग काय करतेस आता?
चार्वी- फुल नाईट शिफ्ट.
मी- म्हणजे?
चार्वी- एका रात्रीचे पाच हजार घेते मी.
मी- काय???
चार्वी- दचकायला काय झालं? तिच तर जागा माझी.
खूप शिकले म्हणजे शरीर आणि भूतकाळ नाही बदलत!
कधी वेळ मिळाला तर ये.
मी- निशब्द आणि लॉग आऊट!
©मकरंद घोडके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा