शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

लॉग आऊट

काही जुन्या डायऱ्या आणि मी असे अडगळीत कधीतरी गप्पा मारत असतो! सांगत असतो एकमेकांना असंच काहीबाही वगैरे वगैरे...काही तपशील असे लिहून हातावेगळे झाले तरी ते चिकट आणि चिवटपणे साठत राहतात तिथे आणि खूप वेळा तिथे रेंगाळणाऱ्या आठवणी होऊन जातात विनापाश! त्याच्यावर आपला छाप असतो खरा, पण त्या तितक्याच आपल्या नसतात हेही खरं आहे!

चार्वी माझी मैत्रीण नाही की ओळखीची सुद्धा नाही! एका ब्लड बँकेत भेट झाली रिसेप्शन काउंटर ला!
कुणास ठाऊक कधीतरी या डायरीत जाऊन बसली आणि परवा अचानक तिचा फेसबुक फ्रेंड request चा बॉम्ब आदळला.मग ती accept करण्याआधी तिची डायरीमधली काही पेजेस वाचली..
असं म्हणतात जी माणसे खास असतात तीच तुमच्या वैयत्तिक डायरीचा एक कोपरा होऊन बसतात.

त्यातलीच ही दोन पाने..

चार्वी. ही ब्लड डोनेशन व्हावं म्हणून काम करणारी पोरगी सोशल वर्क मध्ये आली खरी पण तिला स्वतःलाही ठाऊक नाही की तिच्यात जे रक्त आहे ते कुणाचं आहे?
तिची आई वेश्या आहे-किंवा होती म्हणूयात! सगळ्या बायका तशा सारख्याच पण ज्यांच्या शरीर जखमा कुणीही ओरबाडू शकतो तशा त्या वेश्याच!
चार्वीला तशी काही खंत नाही म्हणा,कारण त्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा तिने जो मार्ग स्वीकारला आहे तो क्वचितच कोणी स्वीकारला असता!
''
वेश्या पुन्हा पुन्हा जन्मते म्हणून जितका पुरुष जवाबदार आहे तितकंच स्त्रीचं शरीरही जवाबदार आहे!'' असं ती म्हणते जे मला पटत नाही पण उगाच वाद नको म्हणून आपलं मी होलाहो म्हणतो आणि ती तिचं म्हणणं ठासून मांडते-
बलात्कार शोषण हे हल्लीचे ट्रेंडिंग शब्द आहेत. ते येण्यापूर्वी सुद्धा ते होतच होतं पण ते त्या छोट्या म्हणीत अडकून बसलं होतं-पावसाने झोडपलं आणि नवऱ्याने मारलं तर दाद कुणाकडे मागायची? - म्हणजे तो पुरुषांचा हक्कच होता! मग स्त्रिया शिकल्या त्यांना कळलं की आपल्याला सुद्धा स्व आहे आणि तो व्यक्त केला पाहिजे. तसं या पिढीतल्या आजूबाजूच्या स्त्रिया मोठ्या स्व घेऊन मिरवत असतील कदाचित! पण त्याचं काय कौतुक नाही पुरुषाला! तसं ते कुठल्याच काळात पुरुषाने मान्य केलेलं नाही, पण आता फरक इतकाच की ती कमावती आहे त्यामुळे हवं तेव्हा ती पुरुषाला झुगारून देऊ शकते. आता पुरुषाच्या म्हणण्याला ती फार महत्व देत नाही.

तीही कधीतरी शरीरधर्माने भटकत असते.पुरुषाचा बाहेरख्यालीपणा व्यसनीपणा तसा समाजमान्य असतो तसं तेच स्त्रीने केलं तर हाहाकार माजतो इतकी पावित्र्य जपण्याची मोठी जवाबदारी तिच्यावर इतर कामांच्या बरोबरीने आहे.

मी लहान होते तेव्हा कळायचं नाही की रोज बिना ओळखीचे कोण पुरुष इथे आपल्या खोलीत येतात आणि ओळख व्हायच्या पटायच्या आत पसारही होतात! का बरे येत असतील ते? मग दहा रुपयांची नोट हातात पडायची आणि सगळं विसरायला व्हायचं.. खायला मिळायचं, बागेत जायला,फिरायला मिळायचं.

पण शाळा?? ती अशीच दुनियदारीची शिकावी लागली.
जेव्हा मला पहिली पाळी आली तेव्हा सगळ्या मावश्या खुष होत्या.आई खुश होती का? ते मला कधीच कळलं नाही.पण मी तिथून बाहेर पडले आणि काम शोधून स्वतःच स्वतःचं कमवून राहू लागले. आणि हळूहळू कोणत्या भूतकाळातून आपण आलोय ते समजू लागलं.मग पेपर मध्ये चर्चा म्हणून होणारे बलात्कार त्याची कारणे आणि आपण त्याचा भाग कसा आहोत ते कळू लागले.
मग पुन्हा याच वस्ती-वाड्यांमध्ये आले समाजशिक्षणाचं पुस्तक घेऊन तेही कुठला अभ्यास न करता! कारण तो रक्तातच होता. बापही माझा असाच कुणीतरी मजूर असेल..भटकत इथे या वाड्यांमध्ये आईला भेटला असेल आणि कार्यभाग उरकून गेलाही असेल.
बरेच बलात्कार या वस्त्यांमध्ये विरून गेलेत ज्याची सरकार दफ्तरी काहीही नोंद नाही आणि त्याविरोधात हाताच्या बोटांवर मोजावे इतके पडसाद इथल्या पेपरांमध्ये उमटले असतील.
आणि ही बायांच्या शरीराची ठेवणच अशी आहे की त्याला पुरुषासाठी म्हणून साजशृंगार करण्यात आनंद वाटतो त्यांच्या प्रेमवर्षावाने खुश होण्यात त्यांच्या आनंदात न्हाऊन जाण्यात आनंद वाटतो. फरक इतकाच की शरीर सुद्धा मनाने हव्या त्या पुरुषाकडून ते  सगळं मिळवून घेऊ लागलं की त्याला प्रेम आणि नको असलेल्या पुरुषाकडून आलं की त्याला बलात्कार म्हणू  लागतं!

चार्वीची विचारांची रोखठोक असणारी बैठक बऱ्याचदा मला अंतर्मुख करते आणि सांगत राहते अजूनही आपण फक्त समजून घेत आलोय हे सगळं..पण जगू शकलो असतो का हे सगळं असं??

 

डायरी मिटून ठेवली आणि फ्रेंड request accept केली चार्वीची !तिला कनेक्ट झालो मी!पण खरंच कनेक्ट झालो का तिच्याशी??

चार्वीचा मेसेंजर वर hi आला!
मी- hi
चार्वी- आहेस कुठे
मी- इथेच.तू?
चार्वी- मी पण इथेच.
मी- fb ला कशी ?
चार्वी- माणसे हल्ली इथेच भेटतात.
मी- हं पण याचा पण कंटाळा येतो.
चार्वी- हो ना.
मी- मग काय करतेस आता?
चार्वी- फुल नाईट शिफ्ट.
मी- म्हणजे?
चार्वी- एका रात्रीचे पाच हजार घेते मी.
मी- काय???
चार्वी- दचकायला काय झालं? तिच तर जागा माझी.
खूप शिकले म्हणजे शरीर आणि भूतकाळ नाही बदलत!
कधी वेळ मिळाला तर ये.
मी- निशब्द आणि लॉग आऊट!

©मकरंद घोडके

९५२७३०९१९७

 

अनटायटल टेल्स २

नुकताच सुरू झालेला जॉब आणि हातातल्या न सावरता येणाऱ्या बॅग्स घेऊन ती स्टेशनावर आली आणि नको तो प्रसंग समोर उभा!

नवरा म्हणून ज्याला आपण टाकलं तो दात कोरीत समोरच उभा! तसं लक्ष नव्हतं त्याचं तरी तिला उगाच आँकवर्ड वाटू लागलं.पुरुषी नजरेने बाईच बाईपण फक्त शरीर म्हणून! पण बाईच्या दृष्टीने ते मानसिकही असतं! आता मधेच त्याने ओळख दाखवली किंवा आपला हात धरला किंवा नेहमी करतो तशी शिवीगाळ केली तर काय? किंवा नव्या नवरीला उगीच आवडावी अशी शीळ मारून गोड बोलला तर?

इतकं जर तर च दूध सारखं खाली वर होऊ लागलं आणि अंगभर थरथर होऊ लागली

मग काय काय करता येऊ शकतं याचा आढावा घेतला पण गंमत अशी त्याने तिला पाहिलंच नाही आणि कमरेच्या खाली आलेली ढगळी जीन्स वर उचलून दोन्ही हात खिशात घालून तो कुठेतरी पसार झाला

आणि अनेक वर्षे पुन्हा तेच नको असलेले प्रश्न छळू लागले.

 

खरंतर नवरा दारुडा आणि चारित्र्यहीन म्हणून आपण त्याला सोडलंय खरं पण हे फक्त मला आणि माझ्या परिघातल्या माणसांना ठाऊक. जे नुसते परिघाबाहेर हाताच्या घड्या घालून इस्त्री केलेल्या कपड्यांनी उभे आहेत त्यांच्या दृष्टीने हे थोडं वेगळंच! किंबहुना साचेबद्ध असं की, नवरा कसाही असला तरी हिला सांभाळता आला नाही! ऍडजस्ट सर्वांनाच करावं लागतं ही तेवढी मानाची!! काही नाही हो हिचंच कुठेतरी काहीतरी असणार त्याशिवाय का ठामपणे घर सोडलं हिने! त्यात ऑफिस मधल्या लोकांचे तर वेगळेच तर्क वितर्क! एवढी सुंदर आणि हुशार मुलगी असा टोकाचा निर्णय का घ्यावा या बाजूचे काही आणि काही जण आता आपल्याला संधी आहे अशा तयारीनिशी मदतीला उभे!!

पुन्हा जर तर सुरू- आपण पुरुष असतो तर आपण परिघाबाहेर विचार केला असता का? सहजपणे भिडलो असतो का या समस्येला? आणि खरंच असे ठाम स्वतंत्रपणे उभे राहिलो असतो का?

आता भुकेने मनाचा ताबा घेतला आणि त्या बॅग्स कशाबशा ओढत स्टेशनजवळ हॉटेलात मांडल्या. एक वडापाव घेतला आणि बकाबका हाणला! मग चहा घेऊन शांत डोळे मिटून घुटके घेऊ लागली ती.

चहा झाला आणि पैसे देण्यासाठी पाकीट उघडलं आणि काउंटर ला गेली तर अचानक नवरा म्हणणारा कुठून भसकन उगवला देवजाणे! मगासारखंच आताही त्याने पाहिलं नाहीच आणि अगदी जवळून गेल्याने त्याचा दारुडा उग्र वास नाकात कोंडला! आता हटकलं असतं तर पुन्हा तोच तमाशा झाला असता- लायकी नाही तुझी - मला अक्कल शिकवतेस, पैशाचा माज दाखवतेस! चालती हो वगैरे वगैरे

मी ना ही अशी खूप घाबरून किती आणि कसे दिवस ढकलावेत हे आता समजत नाहीये. हे शहर इथली माणसे त्यांच्या माझ्याविषयी च्या समजुती गैरसमजुती नकोच मला. थोडं बाहेर पडते इथून आणि नव्याने परीघ आखते आता! परिघाबाहेरचा परीघ! एका अशा जगात जाते जिथे माझं म्हणून खरंखुरं आयुष्य असेल ज्याला अर्थ असेल मर्यादा नसतील.

मी कशी या जाळ्यात अडकले कशी काय भुलले असेल या नवरोबाच्या भूलथापांना?? की स्त्री म्हणून चॉईस नसतोच हातात काही!ही मानसिक आंदोलने कुचंबना आणि व्यक्ती म्हणून सतत होणारे मानसिक आणि शारीरिक बलात्कार हाच की काय तो स्रीधर्म!

आता गाडी येते सगळं सामान कसंबसं एसटीमध्ये ती चढवते आणि महिलांसाठी असलेलं राखीव सीट मोकळं होण्याची वाट बघू लागते. जिथे त्या रांगेत सगळी पुरुषच पुरुष मंडळी मूग गिळून गप्प बसलेली असतात अगदी निर्ढावलेली आणि प्लेन चेहरा ठेऊन! बरं वर चढताना एसटी कुठे निघाली हेही तिने नीटसं पाहिलं नव्हतं, पण फरक काय पडतो म्हणा- इथून तिथून सगळं सारखंच तर जग दिसतंय- तपशील थोडे निराळे असतील पण मानसिकता आणि वाट्याला आलेलं जगणं तेच आहे!

इथून बाहेर पडलं पाहिजे बस्स!

 

अनटायटल टेल्स १

ते आणि मी म्हणजे तसे एकच! पण भेट व्हायची नाही ..अधे मध्ये एखादा फोन आणि सविस्तर गप्पा .

कधी कान उघाडणी तर कधी प्रेमळ काळजी वजा पाठराखण . तसे कोण तुम्ही कुणाचे काहीही असता नसता, ठाऊक नाही, पण एक दुवा असतो. आपला माणूस कुठेतरी आपला विचार करतोय अशी हक्काची गडद सावली तुमच्या वर पडलेली असली कि आतून कसं छान आणि गारगार वाटतं राहतं.
मी काम नसतानाही बऱ्याचदा त्यांच्याशी बोलायचो . कधी नुसते हा हू करतील तर कधी चक्क रागावून फोन ठेऊनच देतील आणि पुन्हा म्हणतील - लाज वाटते का किती दिवस झाले साधा फोन ही तू केलेला नाहीयेस !

ठाऊक आहे ते विसरले असतील किंवा फोन वर मिस कॉल पण दिसतं हे त्यांना ठाऊक नसेल तरीही मीच प्रांजळपणे माफी मागून पुन्हा उत्तरतो-

हो माफ करा सॉरी चुकलं माझं बघा - साफ विसरलोच मी !!
पुन्हा त्यांचं आहेच - बघ तोंड वर करून म्हणतो कसा - विसरलो म्हणे !
म्हातारा असलो म्हणून काय झालं - आहे तर हाडामासाचा माणूसचं ना!
बरं चुकलं माझं sss मी सूर लावून बोलतो
तिकडून हळू आवाजात - घरी ये मिसळ केलीये , म्हातारी यायच्या आधी फस्त करू !!

बरं आता तुम्ही गेलात ! म्हातारे असलात म्हणून काय झालं !! मेलात ते मेलात बऱ्याच आठवणी विसरूनही गेलात! तुमचा वाढदिवस होता आज आणि तो आपण सेलिब्रेट करणार होतो - पेढे खाऊन , शिवाय डायबेटीस काय रोजचाच होता , एक पेंढ्याने काय मरत नाही माणूस हेही तुम्हीच ठासून बोलणार होता .
आता देवाकडून व्हाट्सअँप तर घ्या तुमच्या मोबाईल वर !! ते गुलाब गुच्छ कुठे पाठवायचेत मी??
आणि यंदा तुम्ही विसरलात मला, मी तर फोटोला हार पण घातलाय तुमच्या !! परत रागावू नका उगाच मला !!
म्हातारे कुठले -----हं

ते काय असतं ना या म्हाताऱ्या जीवाचं कि ते आपल्यात तरुण व्हायला पुन्हा त्या त्यांच्या चुका आपल्याकडून गिरवून घ्यायला असे काठी घेऊन समोर ठाकलेले असतात. धाक दाखवून रागावून ही जीवापाड प्रेमच करत असतात ते.
आपण मात्र तरुण ! कधीच म्हातारे होणार नसतो ना त्यांच्यासारखे त्यांच्याइतके ! आणि असे वेडे तरुण आपल्या म्हातारवयाला शिल्लक म्हणून कोण बांधणार ? चला 'ते' फोन करून किंवा व्हाट्सअँप शिकून दम द्यायच्या आत सटकतो . नमस्कार.

लॉग आऊट

काही जुन्या डायऱ्या आणि मी असे अडगळीत कधीतरी गप्पा मारत असतो ! सांगत असतो एकमेकांना असंच काहीबाही वगैरे वगैरे ... काही तपशील असे लिहून हाता...